पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि उच्चायुक्तांसोबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची झालेली बैठक मोठ्या वादात सापडली आहे. याप्रकरणी आजी माजी पंतप्रधानांनी एकमेकांवर टीका केल्यावर आता अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांना का भेटले, याचे उत्तर त्यांनी देशाला दिले पाहिजे, असे जेटलींनी म्हटले. ‘देशाच्या धोरणांशी पूर्णपणे विसंगत असलेली बैठक काँग्रेस नेत्यांकडून का घेण्यात आली? या बैठकीची नेमकी काय आवश्यकता होती,’ असे प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केले. दोन्ही देशांच्या डीजीएमओंच्या बैठका होत असतात. मात्र जोपर्यंत पाकिस्तानमधील दहशतवाद समूळ नष्ट होत नाही, तोपर्यंत उच्चस्तरीय बातचीत होणार नाही, हे देशाचे धोरण आहे. मात्र मणिशंकर अय्यर यांच्यासारख्या लोकांना कधीही राष्ट्रीय धोरण समजत नाही. दहशतवादासोबत संवादाची प्रक्रियादेखील सुरु राहावी, असे त्यांना वाटते. मात्र माजी पंतप्रधान आणि वरिष्ठ नेत्यांनी अय्यर यांचे निमंत्रण स्वीकारुन अशा बैठकीला हजर राहणे चुकीचे आहे,’ असे जेटली यांनी म्हटले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews